श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थानचा अद्भुत इतिहास

महाराष्ट्र ही देवीदेवता, साधुसंत व शूरविरांची भूमी. मुळा नदी, प्रवरा नदी व गोदावरी या नद्या अहिल्यानगर जिल्ह्याला निसर्गाने दिलेले अनमोल वरदान आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भामानगर (भौमाठाण) हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले गाव, याच भामानगर शिवारात, श्रीरामाच्या अश्रुंची पवित्र शिळा आहे.
त्रेतायुगात महाराष्ट्राचा बराचसा भूभाग जंगलमय असल्याने त्यास दण्डकारण्य म्हणायचे. गोदावरी नदीच्या तिरावरील जंगलात ऋषीमुनींचे वास्तव्य होते. त्या काळात लंकाधीश रावणाने या दण्डक अरण्यात घुसखोरी केली. त्याच्या दैत्यांनी ऋषीमुनींवर खूप अत्याचार केले. त्यावेळी श्रीराम, लक्ष्मण व सीतासहित चौदा वर्षे वनवासात होते. नासिकमध्ये पंचवटीत पर्णकुटी बांधून राहत असताना त्यांनी, खर आणि दुषण राक्षसासहित, दैत्यांचा वध करून त्यांच्या अत्याचारातून ऋषीमुनींना मुक्त केले. रावणाची बहिण शुर्पनखेला श्रीलंकेत पिटाळले. हे जेव्हा रावणास कळले तेव्हा त्याने राम लक्ष्मणाला मारण्याची व सितेचे हरण करण्याची कुटील योजना केली. गोदावरी नदीच्या काठावर त्याने पांच गुप्त सैनिकी छावण्या केल्या. मारीच दैत्य मायावी सुवर्णमृग बनून. श्रीरामाच्या पर्णकुटी समोर आला. या सुवर्णमृगाच्या कातड्याची चोळी (कंचुकी) मला हवी अशी इच्छा सितेने व्यक्त करताच. श्रीराम त्या सुवर्ण मृगाला धरण्यासाठी धावले. लक्ष्मण सितेचे संरक्षण करण्यासाठी पंचवटीला थांबले. तो सुवर्णमृग, गोदावरी नदीच्या काठाने धावतांना, रावणाच्या गुप्त सैनिकांनी रामावर हल्ला केला. रामाने पाचही छावण्यातील सैनिकांसी युध्द केले. काही युध्दात मारले गेले, जे वाचले ते पळून गेले.
प्रवरा संगमाजवळ श्रीरामाने त्या सुवर्ण मृगाला मारले ते गाव कायगावटोका या नावाने आजही प्रसिध्द आहे. तो मृग खाली पडताच त्याने आक्राळ-विक्राळ रूप प्रगट केले. त्या मारीच राक्षसाने मरताना, हे रावणाचे कुटील कारस्थान असल्याचे सांगितले. लक्ष्मणाला मारून रावणाने सितेला पळवून नेले असेल. असे सांगताच राम पंचवटीकडे निघाले. वाटेत ते याच भामाठाण शिवारात एका निंबाच्या झाडाखाली थांबले. काही वेळाने लक्ष्मण तिथे आले. रामलक्ष्मणाची भेट याच ठिकाणी झाली. लक्ष्मणाला पाहून रामाची खात्री झाली की, त्या मायावी रावणाने सितेचे हरण केले असेल. जी सिता माझ्यासाठी सर्व राजवैभवाचा त्याग करून, वनवासात आली. तिने पत्नी धर्म पाळला, परंतु मी धर्नुधारी राम पती धर्म पाळू शकलो नाही. राम या ठिकाणी रडले. त्याच्या अश्रृंनी इथली माती भिजली. त्यांच्या अश्रृंनी भिजलेल्या मातीची शिळा झाली. तेच हे भामाठाण पवित्र ठिकाण आहे. कलियुगात याच शिळेवर, गोरक्षशिष्य, माणिक शेतकऱ्याने बारा वर्षे तपसाधना केली. तेच माणिक, अडभंगनाथ या नावाने प्रसिध्द झाले. याचा उलगडा सद्‌गुरू नारायणगिरी महाराजांनी केला.

सद्‌गुरू नारायणगिरी महाराजांचा जन्म, मराठवाड्यातील नेकनूर (नेनगूर) गावी झाला. नारायणगिरींचे बालपणीचे बलभिम हे नाव होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्री. भानुदास नागोजी जाधव व आईचे नाव प्रयागाबाई होते. त्यांना दोन भाऊ, बाबुराव व ज्ञानोबा होते. त्यांच्या सावत्र आईचे नाव अनुसूयाबाई होते. दोन सावत्र भाऊ व दोन सावत्र बहीणी होत्या. बलभिम बालपणापासून कुशाग्र, बुध्दीचे व तापट स्वभावाचे होते. मराठवाडा कायम दुष्काळी असल्याने मागासलेला होता. त्यांच्या आईला मुलांना शिकविण्याची इच्छा, परंतु परिस्थितीमुळे नवरा-सवत व आईत कायम भांडणे होत. मुलांचे शिक्षण येथे होणार नाही हे लक्षात येताच त्यांनी मुलांना बरोबर घेऊन नेकनूर सोडले ते सोलापूरला शिवमंदिरात राहिले. नेकनूरला बंकटस्वामी कडून भजनाची व मृदुंग वाजवण्याची कला बलभिमला अवगत होती. सोलापूरला आईला बगीच्यात फुले तोडतांना साप चावला पण त्यातून त्या वाचल्या. त्यांना त्यांच्या नंदेने नेकनूरला परत आणले.बलभिमची कुशाग्रबुध्दी व धार्मिकतेची आवड पाहून बंकट स्वामिंनी त्यांना आळंदिला पाठविले. आळंदिला त्यांचे वारकरी शिक्षणाबरोबर, रामायण- महाभारत, गिता, विचारसागर वेद, उपनिषेद, पुराणाचा अभ्यास झाला. पुण्याला संस्कृत शिक्षण झाले. काही काळ हिमालयात जाऊन तपसाधना करून अध्यात्मिक ज्ञान संपादन केले. त्यानंतर आळंदिला आश्रमात गुरूकुलातील विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम केले. त्यांना सारे गुरूजी म्हणत. बलभिम गुरूजीचे सराला बेटावर येणेजाणे असायचे. त्यावेळी सराला बेटाचे महंत सोमेश्वरगिरी (कोंडाजी काका) होते. बलभिम गरूजींचे, किर्तन, प्रवचन, अभंग म्हणणे मृदुंग वाजविण्याचे कौशल्य पाहून, महंत सोमेश्वरगिरीनी बेटावरील विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणाची कामगिरी सोपविली. मुलांना शिकविण्याबरोबरच भजन किर्तनाचे कार्यक्रम करू लागले. सन १९५३ ला महंत सोमेश्वरगिरीनी त्यांना निलगिरी महाराजांच्या हस्ते सन्यास दिक्षा दिली. त्याचे दिक्षा नामकरण “नारायणगिरी” असे केले. बलभिमाचे नारायणगिरी झाले. सन १९५७ ला महंत सोमेश्वरगिरी ब्रह्मलिन झाले. तेव्हा सराला बेटाचे पाचवे महंत सद्‌गुरू नारायणगिरी झाले.
योगिराज गंगागिरींनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे सर्व धार्मिक कार्य, सद्‌गुरू नारायणगिरी महाराज करीत. दरवर्षी श्रावण शु. पंचमी ते श्रावण शु. द्वादशी या काळात सातदिवस हरिनाम सप्ताह असतो. या सप्ताहात हरिनामाबरोबरच सात दिवस मोठ्या प्रमाणावर अन्नदान होते. या सप्त्याला ३० ते ४० लाख लोक असतात. नारायणगिरी अध्यात्माचे ज्ञाता व धर्माचे वर्म जाणणारे होते. आपल्या ओजस्वी वाणीतून किर्तनातून व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन, स्त्रिमुक्ती, गोपालन या विचारानी त्यांनी समाजाला एकत्र करून ईश्वर भक्तीकडे लोकांची मने वळविली. लोक त्यांना देव मानीत. त्यांचे हजारो शिष्य झाले. त्यात श्री. जनार्दन राजाराम मुठे होय. श्री. जनार्दन राजाराम मुठे भामाठाणचे रहिवासी. जनार्दन बाबा व नारायणगिरी महाराजांचे श्रीकृष्ण सुदाम्या सारखे सख्य होते. सद्‌गुरू नारायणगिरी महाराजांच्या इच्छेने मुठे वस्तीवरील सर्वात लहान व गोड स्वभावाचा अरूण नावाचा शिष्य. मुठे वस्तीवर सन २००१ ला महाराजांनी पाठविला.

छ.संभाजीनगर जिल्हा, तालुका गंगापूर येथील आगाठाण हे छोटेसे गाव. हे गांव लासूर स्टेशनजवळ आहे. आगाठाण गावचे श्री. रमेश जगन्नाथ औताडे व त्यांची धर्मपत्नी समिंदराबाई रमेश औताडे, सात्विक, सोज्वल व भोळसर स्वभावाचे गरीब शेतकरी कुटुंब. ४ नोव्हेंबर १९८१ बुधवार दिवशी गोपाळवाडीला आजोळी अरुणोदयाच्या वेळी पूत्र जन्मला. त्याचे नाव अरूण ठेवण्यात आले. अरूणजींना हीराबाई व बद्रिनाथ हे दोन बहीण भाऊ आहेत. अरूणजी श्री. शामराव जगताप (आईचे वडिल) अजोबांचे खूप लाडके. शामराव आजोबा निष्ठावंत वारकरी असल्याने त्यांच्या बरोबर किर्तन, भजन व अभंग गाण्याची आवड अरूणजींना होती.

पाच वर्षाच्या अरूणजींचे नाव शाळेत पहिल्या वर्गात दाखल झाले. परंतु अरूणजी अभ्यासात रमलेच नाहीत. त्यांच्या भजन अभंगाच्या वेडामुळे. त्यांना सहामहिन्यातच शाळेतून काढण्यात आले. आता रानात गायी चारण्याचे काम त्यांना करावे लागले. गायी चारतांना मोठमोठ्याने अभंग गाताना त्यांना एक वेगळाच आनंद मिळत असे.

एके दिवशी नरहरी रांजनगावला शामराव आजोबाबरोबर, नृसिंह जयंतीला, सद्‌गुरू नारायणगरींचे किर्तन ऐकले. किर्तनातील प्रल्हादाची गोष्ट त्यांच्या मनाला भावली. महाराज म्हणाले, बालध्रुव, भक्त प्रल्हादाला महर्षी नारदासारखे सद्‌गुरू मिळाले. त्यामुळे त्यांना ईश्वर भेटला. प्रत्येकाने सद्‌गुरू करावा तेव्हाच ईश्वर प्राप्ती होईल. बाल अरूणजींच्या मनात विचार आला. आपल्याला सुध्दा नारदमुनीसारखे सद्‌गुरू भेटले तर ईश्वराची प्राप्ती होईल. परंतु आपल्याला नारदमुनीजी गुरू भेटणार कसे? म्हणून काय झाले. नारदमुनी दिनरात ज्या परमेश्वराचे नारायण, नारायण नाव जपतात, त्या परमेश्वराचे पवित्र नाव ज्यांचे आहेत. नारायणगिरी महाराजच मी सद्‌गुरू करणार हा मनासी निश्चय केला. सतत हाच ध्यास, नारायणगिरी महाराजांनाच सद्‌गुरू करायचे. त्याकरिता गुरूकडे सराला बेटावर जावे लागेल.

अरूणजी आठ वर्षाचे असतांना एके दिवशी, आईला सांगून ते सराला बेटावर सद्‌गुरूकडे निघाले. दोन दिवस पायी चालत हे चिमुरडे पोर सराला बेटावर आले. प्रथम सद्‌गुरूंनी, एवढ्या लहान मुलांना बेटावर प्रवेश नाही असे सांगितले. परंतु बालहट्टापुढे सद्‌गुरूंचे मन द्रवले. शिक्षणाचा गंध नसलेल्या या मुलाला अ, आ, ई, पासून बराखडी उजळणी शिकवली, एका वर्षात हरिपाठ व काही अभंग मुखोद्गत झाले. सद्‌गुरू सांगतील ती कामे अरुणजी करीत, त्यांच्या गोड व मनमिळावू स्वभावामुळे ते बेटावरील व बेटावर येणाऱ्या भक्तांचे लाडके झाले. सद्‌गुरू त्यांना लाडाने “रतनलाल” म्हणून हाक मारीत. सद्‌गुरूंच्या आज्ञेने, गुरूबंधु बरोबर हिमालयाची पायी यात्रा केली. मनोभावे बारावर्षे सद्‌गुरूची सेवा केली. आता अरूणजी विस वर्षाचे झाले. एके दिवशी सद्‌गुरूंच्या आज्ञेने ते भामाठाणला आले, मुठे बाबांच्या वस्तीवरील मंदिराची देखभाल पूजा अर्चा करण्याचे काम गुरुआज्ञेने सुरू झाले. फावल्यावेळात वस्तीपासून दूर एकांत स्थानी ध्यान धारना करण्यासाठी जात या माळरानावर दाट काटेरी झाडीत मोठे निंबाचे झाड होते. त्या निंबाखाली एक भव्य शिळा व निंबावर जिर्ण झालेला झेंडा. हे नाथाचे ठिकाण असून येथे धर्मनाथ बीजला, लोक धर्मनाथ उत्सव व अन्नदान करतात, असे त्यांना गुरे चारणाऱ्या श्रावण मोरेंनी सांगितले.

याठिकाणी ध्यान धारणा करताना अरुणजींना वेगवेगळ्या अनुभूती येऊ लागल्या. एके दिवशी शिळेखालून धूर निघताना पाहून त्यांना भिती वाटली. त्यांनी सद्‌गुरू नारायणगिरींना हे जेव्हा सांगितले. त्यावेळी सद्‌गुरूंनी डोळे मिटून चिंतन केले व सांगितले. सिताविरहाने दुःखी झालेल्या श्रीरामाच्या अश्रूनी भिजलेल्या मातीची ही शिळा आहे. याच शिळेवर गोरक्ष शिष्य माणिक शेतकऱ्याने डोक्यावर औतऐठणचे ओझे घेऊन अन्नपाण्याविना बारा वर्षे घोर तप साधना केली. ही अडभंगनाथांची तपोभूमी आहे. हजारो वर्षापूर्वी येथे अडभंगनाथांचा मोठा आश्रम होता. काळाच्या ओघात ते सर्व वैभव नष्ट झाले आहे. अडभंगनाथ चिरंजीव आहेत. याच जमिनीत एक विहीर आहे. त्या विहीरीत एक गुप्त भुयार आहे. तेच अडभंगनाथांचे ध्यान साधनेचे ठिकाण आहे. अडभंगनाथाच्या धुनीचा धूर व वेगवेगळ्या अनुभूती तुम्हाला, या जागेचा जिर्णोध्दार करण्याचे संकेत देत आहे. हजारो वर्षापूर्वीचे वैभव पुन्हा तुमच्याच हाताने साकारले जाणार हेच विधीचे विधान आहे. असे मला संकेत मिळत आहे. तुम्ही या तपोभूमित रामशिळेवर मंदीर बांधून नाथाचे पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्या ही माझी व अडभंगनाथांची इच्छा आहे.

सन २००५ ला दशहरा (विजयदशमी) मुहुर्तावर सद्‌गुरूंनी स्वतः भूमीपूजन केले व मंदिराच्या बांधकामाला सुरूवात झाली. ईश्वरइच्छेने ९ मार्च २००९ ला सद्गुरू नारायणगिरी महाराज ब्रह्मलिन झाले. या घटनेने अरुणनाथगिरीजी खूप दुःखी झाले. तद्नंतर त्यांनी स्वतःला सावरले. २०१४ ला मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. धर्मनाथ बीजला अडभंगनाथ, सद्‌गुरू नारायणगिरीजी महाराज व अन्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा करवीरपिठाचे शंकराचार्य देवगडचे महंत भास्करगिरी महाराज व इतर महान संतांच्या उपस्थितीत हजारो भक्तांच्या साक्षीने पार पडला. या मंगलमय प्रसंगी, अरूणजींना, देवगडचे महंत भास्करगिरींच्या हस्ते, नाथसंप्रदायाचे दिक्षा नामकरण अरूणनाथगिरींजी असे केले. वारकरी संप्रदायाबरोबरच नाथ संप्रदायाचा महिमा ते किर्तनातून लोकांना सांगतात.
नाथसंप्रदाय अनादी काळापासून आहे. नाथ संप्रदायापासूनच वारकरी संप्रदाय निर्माण झाला आहे. नाथसंप्रदाय मालीकेतील एक कडी, अडभंगनाथ आहेत. हजारो वर्षापूर्वी, आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील, श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी नदीच्या काठावरील “भामानगर गाव”, त्याकाळी “भौमाठाण” या नावाने ओळखले जायचे. या गावातील शिवदास बाबा व ज्वालामायीच्या घरी शिवकृपेने, अग्निदेवाने जन्म घेतला त्या मुलाचे नाव “माणिक’ ठेवले. बालपणापासूनच माणिक विलक्षण दैवी गुणी मुलगा. त्याला शेती व बैलाचा खूप लळा होता. सद्‌गुरू नारायणगिरीजींनी हजारो वर्षापूवींची अडभंगनाथांची कथा सांगितली.

उगवणाऱ्या सूर्याचे प्रतिबिंब, संथ वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या प्रवाहात चकाकत होते. त्या उगवणाऱ्या सूर्याला आर्द देत, एक नाथपंथिय योगी ‘अल्लख निरंजन आदेश’ मुखाने गर्जत होता, त्याचा धीरगंभीर आवाज त्या शांत वातावरणात, आसमंतात घुमला. शिवमंदिराची घंटा घणघणली, आमराईतून कोकीळेचा आवाज मंगल संदेश देत जणु, गोदाकाठी विसावलेल्या छोट्याशा भामाठाण गावाला जागवित होता. शिवदास बाबा व ज्वालामाईची आंघोळ, केव्हाच आटोपली होती. आज श्रावण सोमवार, शिवमंदिरातून शिवाभिषेक करून, दोघे पती पत्नी विचाराच्या तंद्रित शिवालयाच्या पायऱ्या उतरत असता ‘अलख निरंजन’ आवाजाने दोघेही भानावर आली, एक नाथपंथीय योगी, समोर दोन्ही पायांना वरखाली करीत, गुडघ्यावरील घुंगरांचा खुळंगखुकुंग नाद करीत उभा होता. दोघा पती पत्नीने त्यांना, श्रध्देने वाकून नमस्कार केला. योगीराजाने पुत्रवती भव ! आशिर्वाद देत झोळीतील विभुती, दोघांच्या कपाळावर लावली. त्यांच्या आशिर्वादपर बोलाने क्षणभर दोघेही सुखावली. पण दुसऱ्याच क्षणी, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला. त्यांनी समोर पाहीले, योगी केव्हाच निघून गेला होता. त्या जाणाऱ्या योग्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ते कितीतरी वेळ पहात होते.

भाकरीचे पीठ मळता मळता, माईंना सकाळचा हा प्रसंग आठवला. केवढी तेजस्वी मुर्ती त्या योग्याची! वाकून नमस्कार करताच पुत्रवती भव असा बोलला. पण आपण काही बोलायच्या आधीच, झपझप पावले टाकत निघूनही गेला. माझे गाऱ्हाणे कोणालाच ऐकावयाचे नाही का? तव्यावरची बारीक चाणकी उलथीपालथी करून, ती पेटलेल्या चुलीतील आगीत टाकीत, माईने अग्नी देवतेला दोन्ही हात जोडले. हे अग्नी नारायणा स्वयंपाकाचा पहिला घास, मी रोज तुला अर्पण करते व मगच स्वयंपाक बनविते. अकरा वर्षात मी माझ्या या साधनेत, कधीही खंड पडु दिला नाही, तुला पहिला घास भरविला. तुला कधीच उपवाशी ठेवले नाही, पण तु माझी मातृत्वाची भुक केव्हा भागविणार? तुझ्या सारखा तेजस्वी, परोपकारी व किर्तीवंत एक पुत्र दे, अशी मी रोज प्रार्थना करते, अकरा वर्षे लग्नाला झाली आता हे वांझपनाचे निरर्थक जगणे नको झाले रे! माईने हातावर केलेली दुसरी भाकरी तव्यावर टाकली. त्यांचे डोळे पाण्याने डबडबले, ते चुलीतील धुराने की मनातील खंताने हे त्यांनाही कळेना. देवघरातून शिवदास बाबांचा शिवमहिम्न स्तोत्राचा आवाज येत होता. “पतीत मज पावण्या, मन रमो तुझ्या गायनी। कृतार्थ कर शंकरा, त्रिपुर दाहका जीवनी।” चुलीतील लाकडे सरकवीत जळो मेला हा संसार, पूर्वजन्मीचे प्रारब्ध. कुणालाच कशी माझी दया येत नाही? मायी स्वतःशीच बडबडत होत्या; इतक्यात ‘अलख निरंजन’ भिक्षा दे माई। अशी हाक आली. माई तश्याच लगबगीने उठल्या. पिठाने माखलेल्या हातानेच पसा दोन पसा दाणे सुपात घेत त्या बाहेर आल्या पाहातात तर सकाळचाच तो योगी. माई भिक्षा देण्यास येताच योगी म्हणाला नको माई। तुझ्या हातची कोरडी भिक्षा नको। आज तुझ्या हातचे जेवण करण्याची इच्छा आहे. आईच्या हातचे जेवण कधी जेवलोच नाही. तु देशील मला जेवण? इतक्यात देव घरातून बाहेर येत शिवदास बाबा म्हणाले, ‘या महाराज या’ आज आमचे भाग्य उजळले प्रत्यक्ष शंकरच आमच्या घरी आले. माईने लगबगीने घोंगडी अंथरली, बसा महाराज आता स्वयंपाक करते. पोटभर जेवण करा.

माई मी तुमच्या घरी मुद्दामच आलो आहे. सकाळी तुम्हा दोघांना मंदीरात पाहताच जाणले की, तुमच्या घरी प्रत्यक्ष अग्नीदेवता पुत्र रूपाने येणार आहेत. तुमचे जन्मोजन्मीचे पुण्य तुमच्या घरी बाळ होऊन, तुमचे जीवन धन्य करण्यासाठी, अग्नीदेव येत आहेत. मी गोरक्षनाथ. माझे सद्गुरू मच्छिंद्रनाथ व प्रत्यक्ष शिवाचा आदेश आहे. मी आपणाकडे जेवण करेन. परंतु परमेश्वर या जागेत अवतरणार आहेत. त्यासाठी काही पुजाविधी तुमच्या हाताने करावी लागेल. योग्याचे बोल ऐकूण शिवदास बाबा व माईंना हे जीवन धन्य झाल्याचा आनंद झाला‌.

गोरक्षनाथ हवन पुजेची तयारी करत असताना, त्यांना बऱ्याच वर्षापूर्वी घडलेला प्रसंग आठवला. आपण सद्‌गुरू मच्छिंद्रनाथांचा शोध घेत असताना, जालंदर नाथाचे प्रिय शिष्य, कानिफनाथाची भेट झाली. त्यांच्या बोलण्यातून ज्ञात झाले की, शृंगमुरडा नावाच्या स्त्री राज्यात, मैनाकीनी राणीच्या मोहात अडकून, मच्छिंद्रनाथांनी नाथ बाणा त्यागला आहे, राजवेष धारण करून मैनाकीनीशी विवाह केला व त्यांना मिननाथ नावाचा मुलगा सुध्दा आहे, हे ऐकूण लञ्जेने व क्रोधाने आपला संताप अनावर झाला. गुरूला त्या स्त्रिच्या मोहातून सोडवून आणु व त्या स्त्रीला शिक्षा करू या उद्देशाने स्त्री राज्याकडे निघालो, चालताना याच भामाठाण गांवी, गोदावरीच्या तिरावर महर्षी नारदाची भेट झाली. त्यानां सर्व वर्तमान कळाले, तेव्हा ते म्हणाले होते, गोरक्षा तुझा क्रोध अनाठायी जरी नसला, तरी शांत मनाने विचार कर नाथपंथात सर्वश्रेष्ठ तुझा गुरू, तंत्रमंत्र सर्व विद्येत संपन्न, एवढेच नाहीतर ज्या मच्छिंद्रनाथाला, जन्माआधी शिवाने, पार्वतीला सांगितलेले गुह्य ज्ञान प्राप्त झाले. अशा महान योग्याला, जी स्त्री स्वतःच्या मोहजाळात अडकवून, नाथपंथापासून भ्रष्ट करू शकते, ती स्त्री सामान्य असेल का रे? तुझ्या तंत्रामंत्राचा इथे उपयोग नाही.जर तु प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांच्या समोर गेलास तर, झालेल्या घोर अपराधाने मच्छिंद्रनाथाला मेल्याहून मेल्यासारखे होईल. त्यांना पश्चाताप होऊन त्यांनी जीवाचे बरेवाईट केले तर, तू काय करशील? गुरु हत्येचे पाप तुला लागेल. नारदाचे म्हणणे पटले, आपण हताश होऊन म्हणालो, मी प्रत्यक्ष जर नाही गेलो तर त्यांना माझ्या मनाची तळमळ कशी सांगु? व त्यांना परत कसे आणु ? महर्षी तुम्हीच यातून मार्ग सुचवा. त्यावेळी नारद म्हणाले बर थोडा वेळ शांत विचार करू दे. मुनीवर झाडाखाली विणाचिपळ्या वाजवीत बसले.त्यांना भावसमाधी लागली, विना चिपळ्यांच्या नाद झंकारातून “हरीनारायण, हरि नारायण” असे शब्द घुमु लागले. आपल्याला कोढे उलगडले. नारदाचे पाय धरून विनवले की, महर्षी मला ही विद्या शिकवा, प्रत्यक्ष न बोलता वाद्याच्या नादातून मनातले शब्द उमटतात. महर्षी म्हणाले या विद्येला “नादब्रम्हातून शब्दब्रम्ह” म्हणतात. ही संगीतविद्या शंकराच्या आज्ञेने,कैलासावर गंधर्वांनाच शिकविण्याचा अधिकार आहे. ही कला मला जरी अवगत असली तरी, शिकविण्याचा अधिकार गंधर्वानाच आहे. त्यासाठी तुला कैलासावर, गंधर्वाकडे जावून ही विद्या ग्रहण करावी लागेल. महर्षीचे बोल ऐकूण आपण किती निराश झालो होतो. परंतु महर्षीनीच सांगितले होते की, तु अग्नीबरोबर कैलासाला जा. अग्नीच्या सहाय्याने ही संगीत कला गंधर्वाकडून शिकावी असे नारदमुनींनी सुचविले होते.अग्नीला प्रार्थना केली, विणवण्या केल्या की, नाथपंथाला सहाय्य कर. हा नाथपंथ शंकराचाच आहे. व तुझे वास्तव्य शिवाच्या नेत्रात असल्याने,शिवाच्या क्रोधाने तुला काही होणार नाही. मग आपण अवधुत विद्येने, अग्नीच्या देहात समरस होऊन, त्याचेबरोबर कैलासाला गेलो. सर्व संगीतविद्या आत्मसात केली पण आपल्याच चुकीने घोटाळा झाला. कैलासी, शिवासमोर गायन सभेत, अग्नीच्या देहात मृदंग वाजविताना, श्री नंदिसेन गंधर्वाने आपल्याला पाहिले. अग्नीचे द्विरूप पाहून त्याची बोबडी वळाली, गायनातील रीषभ स्वर गाताना चुकला. त्याला शिवाने शाप दिला. तु मृत्युलोकात वृषभ म्हणजे बैल होशील. गंधर्वाने शिवाला सर्व हकीकत सांगितली. यात माझी चुक नाही. शिवाने अग्नीलाही शाप दिला की, ज्या मानव योग्याला तु कैलासाला आणुन अपराध केलास, त्या नाथपंथासाठी, तुला मानव होऊन नाथ कार्य करावे लागेल, हा नंदीसेन बैल होऊन, तुला शेतीसाठी सहाय्य करील व योग्यवेळी शाप मुक्त होऊन, हा गंधर्व परत कैलासाला येईल. शिवाच्या आज्ञेने अग्नीदेव, या घरी प्रकट होणार आहेत. गोरक्षाला सर्व आठवले. आपणामुळे हे सर्व घडले व पुढील घटना आपल्यामुळेच घडणार आहेत. एवढ्यात शिवदास बाबा गोरक्षाजवळ येऊन म्हणाले, आणखी काय हवे का महाराज ? शिवदास बाबाच्या बोलण्याने गोरक्ष भानावर आले, मंत्रांनी त्यांनी होम प्रज्वलीत केला व पूजा आरंभ केला. ज्वालामाई व शिवदास बाबांच्या हाताने होम पूजेची सांगता झाली. दोघांनी मिळून होमकुंडातील अग्नीला पुर्णाहुती दिली. त्यांच्या चेहऱ्यावर सात्विक समाधान झळकत होते. गोरक्षनाथ म्हणाले, “माई पदर पुढे कर व हा प्रसाद घे.” ज्वालामाईने दोन्ही हाताने पदर पुढे केला. गोरक्षनाथांनी होमकुंडात हात घालून, धगधगता निखारा हातात घेतला. माई हा प्रसाद पदरात सांभाळून ठेव। माई भितीने दोन पावले मागे सरकत किंचाळल्या, हा निखारा पदरात कसा घेऊ? याने माझा पदर पेटून भाजेल. अगं माई, तुला अग्नीपुत्र व्हावा असे वाटते तर, उदरात कसा सहन करशील अग्नीला? वेळ दवडु नको, पदरात बांधून ठेव हा निखारा. डोळे मिटून माईंनी पदर पुढे केला. गोरक्षाने पदरात निखारा टाकल्याचे जाणवले. त्याच क्षणी ज्वालामाईच्या अंगाअंगातून विज सळसळली. त्यांच्या शरीरात होणारा दाह क्षणात नाहीसा झाला. त्यांच्या रोमारोमात चैतन्य स्फुरले त्यांनी डोळे उघडून पाहिले तर पदरात माणिक नावाचे रत्न होते. माईंनी नाथाचे पाय धरले. माई हे रत्न नित्य पूजीत जा. ज्यावेळी हे माणिक रत्न भंगेल किंवा दग्ध होईल, तेव्हा तुम्हा दोघांना मोक्ष प्राप्त होईल व तुम्ही शिवपुरीला जाल. अकरा वर्षे तुम्हाला बाळाचे सुख प्राप्त होईल. अकरा वर्षांनी मी परत येईल व माणिक बाळाला लोककार्यासाठी तपाला बसविने परंतु त्यावेळी तुम्ही दोघेही नसाल. चंद्र सूर्य असे पर्यंत तुमची व भामाठाण गावाची कीर्ती सर्व जगभर गाजेल असे हे बाळ भाग्याचे होईल. तुम्ही दोघे नित्य सोमवारी उपवास करा. पाच घरी भिक्षा मागून ते शिजवा, त्या शिजवलेल्या अन्नाचे पाच भाग करा, पैकी अग्नी, गाय, जळातील मासे, तसेच एक भाग याचकाला द्या व उरलेला भाग तुम्ही दोघांनी सेवन करा, नित्य अन्नदान करा. असे सांगितले. भोजन करून गोरक्षयोगी तृप्त झाले व बाबा माईंना आशिर्वाद देऊन निघून गेले.

सारा भामाठाण गाव, महाशिवरात्रीला शिवमंदिरात जमला होता. शिवभजनाने सारे वातावरण दुमदुमले होते. आज माईला प्रसुतीकळा जाणवत होत्या. म्हणून शिवदासबाबा व माई घरीच होते. माई आतल्या खोलीत शिवनामाचा जप करीत होत्या. पडवीत खाटेवर शिवदासबाबा, पडल्या पडल्या मंदिरात चाललेले भजन ऐकत होते. भजन ऐकता ऐकता त्यांचा केव्हा डोळा लागला, हे कळलेच नाही. गोठ्यात हंबरणाऱ्या कपिला गाईचा आवाज ऐकून, बाबांना जाग आली. गोठ्यात कपिला का हंबरते म्हणून पाहतात तर, कपिला गाईने ऐका गोंडस बछड्याला जन्म दिला होता. ती त्याला प्रेमाने चाटत चाटत हंबरत होती त्या गो-ह्याचे डोळे मोत्यासारखे चमकत होते. जवळ जावून त्यांनी त्या कपिला गाईच्या व लहान बछड्याच्या अंगावर मायेन हात फिरवीला. त्या बछड्याला मोती म्हणून हाक मारली. ते लहान बछडे, धडपडत हुंकारले. मध्यरात्रीला बाहेर लोकांचा कल्लोळ ऐकून बाबा गोठ्यातून बाहेर आले. त्यांना एक तेजस्वी ज्योत माईच्या बंद खोलीत जाताना दिसली. ज्योतीमागे लोक धावत बाबांच्या घराकडे येताना दिसले. त्यातील लोकबाबांना सांगत होते की, शिवपिंडीतून जी ज्योत निघाली ती तुमच्या घरात गेली, बाबा माईच्या खोलीकडे धावले व दार उघडून पाहतात तर काय? माई झोपलेल्या व त्यांच्या कुशीत नुकतेच जन्मलेल बाळ. सर्व गावाला आश्चर्य व आनंद झाला. बाळाच्या स्पर्शाने व लोकांच्या बोलण्याच्या आवाजाने माईला जाग आली. त्यांना सुध्दा बाळ जन्मल्याचे कळालेच नाही.
बाळ जन्माच्या आनंदाने, साऱ्या भामाठाण गावाला बाबा माईंनी जेवण दिले व बारश्याला बाळाचे नाव ‘माणिक’ असे ठेवले. चंद्राच्या कलेप्रमाणे बाळ दिवसेंदिवस वाढत होते. त्याचं रांगणे, दुडूदुडू धावणे, आई-बाबा असे बोबडे बोलणे ऐकून, जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान माई बाबांच्या चेहऱ्यावर दिसायचे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या माणिकाच्या खोड्याही वाढल्या होत्या. तो हट्टी व जिज्ञासू होता, त्याचे हट्ट पुरविता पुरविता माई बाबाचा प्रपंच आनंदाने फुलत होता. माणिक कपिला गाईच्या मोतीबरोबर तासन्तास गप्पा करीत बसायचा व ते वासरू सुध्दा माणिकाबरोबर खुप मस्ती करायचे व हुंदडायचे. माणिक आठ-नऊ वर्षाचा झाला. तो रोज सकाळी बाबांबरोबर शिवमंदिरात जायचा. त्याला भजनापुजनाची भारी आवड. एकादशीला, शिवरात्रीला भजन किर्तनात तो रंगुन जायचा. त्याच्या बाल गोड गळ्यातून भजन ऐकतांना, ऐकणारांना भान विसरायला व्हायचे. माणिक गावातील मुलांबरोबर गाय म्हशी चारण्यासाठी रानात जावू लागला. हळुहळू शेतीची कामे करू लागला. बघताबघता शेतीविषयी त्याला खुप जाण आली, मंरिदातील पुजाऱ्याने त्याला लिहायला वाचायला शिकविले, अक्षरओळख झाली.रानात सर्व मुलांबरोबर सहभोजनाचा आनंद घेताना तो देवधर्माच्या गोष्टी सांगायचा. त्यांना नवीन नवीन भजने म्हणून दाखवायचा. शेती, पक्षी, जनावरे, झाडे यांच्याबद्दल खुप बोलायचा. ईश्वराने निर्मिलेले सर्व जीव, आपले मित्र आहेत. त्यांच्यावर प्रेम करावे. असे खुप बोलायचा. माहीती सांगायचा. व्यायाम, कुस्त्या, काठीलाठी हे खेळ तो गावातीलच भैरू पहिलवानाकडून शिकला व तो रानात मुलांना शिकवायचा. तो सर्वांचा लाडका होता.माणिक शेतीची कामे करू लागला. हवामानाचा अंदाज घेऊन, यंदा कोणते पीक करायचे हे लोकांना एखाद्या कृषीतज्ञाप्रमाणे सांगायचा. शेतीत खूप उत्पन्न मिळायचे. सारे चांगले चालले होते पण दैवात वेगळेच होते. अचानक बाबा माईंच्या घराला आग लागली, संपुर्ण देवघर जळुन गेले. देव्हाऱ्यातील माणिक रत्न जळुन गेले. हे दुःख बाबा माईंना सहन झाले नाही. त्या दुखाःतच त्यांचा मृत्यु झाला. इथे गोरक्षाने सांगितलेला ईश्वरी संकेत पूर्ण झाला. माणिक पोरका झाला, त्यास जगण्याची आशाच उरली नाही. काळ असा वैद्य आहे की तो, सर्व त-हेच्या दुःखाच्या जखमा भरून काढतो, माणिकाने स्वतःला सावरले. तो रोजच्या व्यवहारात हळुहळू रमू लागला.

एके दिवशी भर दुपारी, शेतीचा औत सोडून माणिक बांधावरील निंबाखाली जेवणासाठी विसावला. बैलांना बांधावर चरण्यासाठी सोडून दिले, त्याने भाकरीचे गाठोडे सोडले, हातात घास घेतला व तोंडात घालणार, इतक्यात ‘अलख निरंजन’ आवाज आला. समोर एक नाथयोगी उभा होता. उन्हाने तो थकला होता. माणिकाने हातातील घास खाली ठेवला व हात जोडून उभा राहत म्हणाला आज्ञा महाराज काय सेवा करू ?
वत्सा भुकेने व तहाणेने जीव व्याकुळ झाला आहे थोडे अन्न पाणी मिळाले तर बरे होईल. अवश्य, बसा महाराज, त्याने योग्याला बसायला कांबळ अंथरले, हात धुण्यास पाणी दिले व स्वतःची भाकरी दिली, योगी जेवण करून तृप्त झाला. समाधानाने ढेकर देत, योगी म्हणाला बाळ तुझे नाव काय ? तु कोणत्या गावचा? त्यावेळी तो म्हणाला महाराज आपले जेवण झाले, आपला कार्यभाग पूर्ण झाला, आता व्यर्थ चौकश्या कशाला करता? त्या झाडीत दिसते त्या भामाठाण गावचा मी माणिक. झाले समाधान । जा आता आपल्या वाटेने. माझे शेतीचे बरेच काम राहीले आहे, माणिकाला त्या योग्याचा राग आला होता. अप्पलपोट्याने माझी सर्व भाकरी खाल्ली, मला थोडीदेखील ठेवली नाही, भुकेने तो तळमळत होता. योगी म्हणाला अरे बैस वत्सा ! अन्न हे पूर्णब्रम्ह. तू स्वतः उपाशी राहून मला स्वतःची भाकरी दिली, मी प्रसन्न झालो, माग तुला मी काय देवू? योग्याचे बोलणे ऐकूण जरा तिरसट आवाजात माणिक म्हणाला, मला काय नको बाबा. देवाने दिले ते पुरे आहे मला. योगी म्हणाला खरे आहे तुझे म्हणणे तरी पण तु मला काहीतरी माग. माणिकाला वाटले हा योगी लबाड आहे, गोड बोलून हा आपल्याला फसवू पाहत आहे. असे भटके योगी गोड-गोड बोलून फसवतात हे तो ऐकून होता. माणिक रागाने म्हणाला अरे तुच झोळी घेऊन पोटासाठी वणवण फिरतोस. मला देण्यासाठी तुझ्याजवळ आहे तरी काय? तुच मला अजून काही तरी माग, मी तुला देईन. इतक्यात मोती बैल योग्याकडे पाहून मोठ्याने हंबरला. योगी मोती बैलाकडे टक लावून पाहत होता. माणिक म्हणाला, पण लक्षात ठेव. मी माग म्हटलो म्हणून तू माझा बैल मागु नको. गावोगाव फिरताना भिक्षेचे ओझे बैलाच्या पाठीवर ठेवून तू रिकामे फिरायला मोकळा. बैल हे शेतकऱ्यांचे दैवत आहे. बैल सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. ब्रम्हा, विष्णु, शंकर देवांपेक्षाही बैल थोर आहे. माणिकाच्या तोंडून बैलाचे कौतुक ऐकून योगी म्हणाला बैल कसा रे देवापेक्षा मोठा ! अरे जोगड्या पोटासाठी फिरणाऱ्या तुझ्यासारख्याला कसा कळेल बैल महिमा. मी किर्तनातून बैल कसा श्रेष्ठ हे ऐकले आहे, व माणिकाने, शिखामुनीच्या प्रतिज्ञेपासून, विष्णुला नंदिने कसे हरविले, त्याच्या पडलेल्या दाताचे चौदा रत्ने कशी झाली? इंद्राला हरवून तो स्वर्गाचा राजा कसा झाला? व शंकराला हरवूनही शंकराचे वाहन कसा झाला? ही काशी खंडातील कथा माणिकाने गोरक्षाला कथन केली. माणिकाच्या तोंडून बैल पुराण ऐकून, योगी थक्क झाला. व हाच अग्नीचा महान अंश अडबंग अवतार आहे. तपाने याचे अज्ञान दूर करून याला नाथपंथाची दिक्षा दिली तर, हा नाथपंथाचा लौकीक वाढवेल असा विचार येताच योगी माणिकाला म्हणाला, तुला जर मला काही द्यायचेच मनात आहे तर, तु तुझे मन मला दे. तुझ्या मनात जे येईल ते तु करू नकोस. देशील तुझे मन? असे विचारताच क्षणाचाही विलंब न करता माणिक म्हणाला. दिले तुला माझे मन. हे ऐकून, योगी संतोषला व निरोप घेऊन पुढील प्रवासाला चालता झाला.

माणिकाने स्वतःचे सर्व जेवण, योगी गोरक्षनाथांना दिले असल्याने त्याला खुप भूक लागली. त्याने दोन्ही बैल घराकडे सोडून दिले. औत ऐठणाचे ओझे, डोक्यावर घेतले. आता घरी जावून जेवण करू असा विचार करीत तो घराकडे जाण्यास निघणार, इतक्यात त्याच्या लक्षात आले की आपण आपले मन योग्याला अर्पण केले आहे. योग्याने सांगितले की, मनात येईल तसे करायचे नाही. आपल्या मनात घरी जायची इच्छा झाली, आता आपल्याला घरी जाता येणार नाही. तो तेथेच उभा राहीला. तो जेथे उभा राहीला होता तिथे, त्याच्या पायाखाली भली मोठी शिळा होती. तो त्या शिळेवर तसेच औत ऐठणाचे ओझे घेऊन उभा राहीला. घराकडे जाणारे बैल, मालक का येत नाही म्हणून, मागे वळून वळून पहात होते. मोती नावाचा लाडका बैल अर्ध्या वाटेवरून माणिकाला पाहण्यासाठी परत रानात आला. माणिक डोक्यावर औत ऐठणाचे ओझे घेऊन एकटक दुरवर पहात तटस्थ उभा होता. बैलाने उभ्या माणिकाला हंबरून, चाटून सावध करण्याचा प्रयत्न केला. परंतु माणिक जागचा हलेना. हे पाहून बैल, त्याच्या जवळच थांबला. संध्याकाळ झाली तरी माणिक परतला नाही, एकच बैल गावात आला, तर मग एक बैल व माणिक कोठे आहेत? गावातील काही लोक शोध गेत शेतात आले. माणिक व मोती बैल त्यांना उभे दिसले. माणिकाला आवाज देवून, हलवून सावध करण्याचा प्रयत्न केला. परंतु माणिक जागचा हलला, बोलला नाही. कुणीतरी म्हटले, दुपारी कुणी एक नाथयोगी इकडे पाहिला त्यानेच माणिक व बैलावर जादुटोणा केला असावा म्हणून माणिकाला जागचे हलता, बोलता येईना. रात्र झाली. भितीपोटी लोक घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी लोकांनी प्रयत्न केला. पण माणिक तसाच दगडासारखा स्तब्ध उभा होता. तो माणिक बिगर अन्न पाण्याविना बारा वर्षे त्या शिळेवर उभा होता व मोती बैल त्याच्या सोबतीला अशा त-हेने गोरक्षनाथांनी, शापीत अग्नी व शापीत गंधर्वाकडून बारा वर्ष तपश्चर्या करून घेतली. नकळत घडलेल्या चुकांच्या दोषांचे निवारण केले. त्यांच्यातील सुप्त दैवी शक्ती तपश्चर्येद्वारा
जागृत केली.

गोदावरी नदीच्या काठाकाठाने, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ व चौरंगीनाथ बोलत- बोलत चालले होते. त्यांनी दूरवर दिसणारे गांव कोणते म्हणून रस्त्याने जाणाऱ्याला विचारले. ते होय! भामाठाण म्हणत्यात त्या गावाला, भामाठाण नाव ऐकून गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथांना बोलला, ‘बरं का? गुरू महाराज बारा वर्षांपुर्वी मी या गावाला आलो होतो. तेव्हाचा प्रसंग, भर उन्हाळ्याचे दिवस, दुपारची वेळ, तापलेल्या फुपाट्यातून वणवण फिरत होतो, मला खुप तहान, भूक लागली, जवळपास वस्ती दिसेना, मी व्याकुळ नजरेने, चौफेर पाहत जड पावलाने चालत असता, दूरवर त्या तिकडे, एक शेतकरी औत हाकताना दिसला. मी त्याच्याजवळ जाईपर्यंत, तो औत सोडून बांधावरील निंब छायेत जेवणाच्या तयारीत बसला होता. जेवणाकरिता तो हातातील घास तोंडाकडे नेत असता, मी दिलेली ‘अलख निरंजन आदेश’ ही हाक ऐकली. हातातील घास तसाच खाली ठेवून, दोन्ही हात जोडून तो उभा राहीला मला नमस्कार करून काय सेवा करू महाराज? असे विचारताच, मी त्याला म्हणालो वत्सा तहान, भुकेने जीव व्याकुळ झाला आहे. थोडे जेवणपाणी मिळेल का? त्या शेतकरी मुलाने स्वतःचे जेवण, माझेपुढे सरकावले. मी जेवण करून तृप्त झालो. त्याला काहीतरी द्यावे म्हणून त्याचे नाव, गांव विचारले. त्या शेतकरी मुलाचे नांव माणिक व गावाचे नाव भामाठाण कळाले. मुलगा सुस्वभावी पण अडबंग भोळा होता. मी त्याला म्हटले तू मला जेवण दिले, मी तुला काही तरी द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्यावेळी तो म्हणाला, तुमची काहीतरी द्यायची खुप इच्छा असेल हो! पण माझी घ्यायची इच्छा नसेल तर, तुमच्या इच्छेचा काय उपयोग. मी त्याला परोपरीने काहीतरी मागण्याबद्दल बोलत राहीलो तर वैतागाने तो म्हणतो कसा? अरे गोसावड्या तू पोटासाठी झोळ्या घेऊन दारोदारी फिरतोस, तू काय मला देणार? तुच मला काहीतरी माग. तु मागशील ते मी देईन. व पुन्हा बोलला माग म्हटले पण माझे बैल मागू नकोस, तुझे भिक्षा ओझे वाहण्यासाठी, बैल हे शेतकऱ्याचे दैवत आहे. मग त्या मुलाने, पूर्ण काशीखंड ग्रंथच मला ऐकवला. मी त्या मुलातील शापीत अग्नीचा दैवी अंश ओळखला. व त्याच्यातील परमशक्ती जागृत करण्याचे उध्देशाने व त्याचे कडून तप करून घेण्याचे उद्देशाने त्याच्या आडमुठे स्वभावानुसार आडमार्गाने त्याला शब्द जाळ्यात अडकविले. तुझे मन मला दान कर असे सांगितले. व त्याने मला क्षणाचाही विलंब न करता, तसे वचन दिले. असा तो अडबंग आजही तेथे असेल का? चला पाहू म्हणून तिघेही नाथ, त्या दिशेने निघाले. वायुलहरीतून ‘ओम नमः शिवाय’ असा मंगल ध्वनी ऐकू येत होता. दूरवर निंबाच्या छायेत, डोक्यावर ओझे घेऊन मनुष्य उभा दिसत होता. त्याचे जवळच एक बैल उभा दिसला. तिघे नाथ जवळ येताच गोरक्षाने ओळखले की, हाच तो माणिक, डोक्यावर औत, ऐठणाचे ओझे घेऊन उभा आहे. डोक्याच्या जटा वाढल्या होत्या. हातापायाच्या नखांची चुंभळ झालेली, हाडाचे काडे झालेली दिसत होती. अंगावर एकही वस्त्र राहीले नव्हते. दिगंबर अवस्थेत, मुखाने ‘ओम नमः शिवाय’ जप चालला होता. गोरक्ष म्हणाला. हाच तो अडबंग माणिक ! बारा वर्षापासून या शिळेवर उभा आहे. गोरक्ष म्हणाला गुरू महाराज, ही शिळा सामान्य शिळा नाही. ही रामाच्या डोळ्यातून, सिता विरहाचे जे अश्रु, या मातीत सांडले त्या अश्रुंनी ओल्या झालेल्या मातीची ही पवित्र शिळा आहे. त्या रामअश्रुंच्या शिळेचा मायेचा ओलावा, आजपर्यंत माणिकाला मिळाला. गोरक्षाने रामायणातील तो प्रसंग, मच्छिंद्रनाथांना कथन केला. अशा या पवित्र शिळेवर या निरागस माणिकाने बारा वर्षे उभे राहून तप केले आहे. माणिकाच्या कृष शरीराकडे पाहून, मच्छिंद्रनाथांनी त्याला त्या साधनेतून जागे केले. माणिकाने डोळे उघडून तीन्ही नाथांकडे पाहिले. मच्छिंद्र म्हणाले, बाळा सोड आता ही तपसाधना. तू खूप तप केले आहेस. तप साधनेतून जागा हो, हे ऐकून माणिक मच्छिंद्रनाथांना म्हणाला, तुम्हाला काय देणे घेणे माझ्या या तपसाधनेचे व गोरक्षाकडे पहात म्हणाला, मागच्या वेळेला हा एकटाच आला होता. माझी सर्व भाकरी खावून गेला. मला उपाशीच ठेवले. तेव्हापासून मला भुकच लागली नाही. आता तुम्ही तिघे आलात, आता माझ्याकडून तुम्हाला काय पाहिजे? माझे काय करणार आहात तुम्ही तिघे मिळून? आता मी तुमच्या भुलथापांना भुलणार नाही, आल्यावाटेने परत जा. अरे बाळा. आम्ही तुला बरोबर घेऊन जाण्यासाठीच आलो आहे. मच्छिंद्राचे बोल ऐकून, माणिक म्हणाला मला कोठेही यायचे नाही. तेव्हा गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथांना म्हणाले, महाराज तुम्ही दोघे झाडाखाली निवांत बसा, मी त्याच्याशी बोलतो. जसा आजार तसेच औषध द्यायला पाहिजे. गोरक्ष माणिकाला म्हणाले, हे तपेश्वरा मी सर्व पृथ्वी भ्रमण करीत फिरलो. परंतु तुमच्या सारखा तपस्वी मी अद्याप पाहिला नाही. तुमच्यासारखे महाज्ञानी, माझे गुरू असावेत व मी तुमचा शिष्य व्हावा. अशी माझी मनोकामना आहे. तुम्ही मला अनुग्रह देवून. माझे गुरू व्हाल का? गोरक्षाचे बोलणे ऐकून माणिक म्हणाला, अरे वेड्या तुला कळत कसे नाही मीच अद्याप कुणाला गुरू केलेला नाही, मग मी तुला शिष्य कसा करू. असे करतोस का? तुच माझा गुरू हो ! असे म्हणत माणिकाने, शेजारी उभ्या असलेल्या गोरक्षनाथाच्या तोंडाजवळ कान नेला. गोरक्ष याच क्षणाची वाट पहात होते. गोरक्षाने क्षणचाही विलंब न करता माणिकाच्या कानात महामंत्र जपला, माणिक साधनेतून पूर्ण जागा झाला. त्याचे संपूर्ण अज्ञान नाहीसे झाले. त्याला सर्व चराचरात, ब्रम्हस्वरूप दिसू लागले. त्याने गोरक्षाला नमस्कार केला. माणिकाचा हात धरून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाजवळ आले व म्हणाले, हाच तो अडबंग माणिक’, यावर मच्छिंद्रनाथ हसून म्हणाले याला आतापासून अडभंग म्हणा. याच्या नावामुळे अडलेली कामे भंग होतील. मग मच्छिंद्रनाथाच्या आज्ञेने माणिकाला नाथपंथाची दिक्षा देऊन नाथबाणा दिला. व दिक्षांत नाव ‘अडभंग’ असे ठेवले. तो मंगलमय सोहळा पाहण्यासाठी शिवासहित देव गंधर्व या भूमीत आले. सर्व देवांनी ‘अडभंगाला’ आपआपल्या शक्ती भेट दिल्या व परत आपआपल्या ठिकाणी गेले. शिवशंकरांनी, बैलाला शापातून मुक्त केले. व आपल्या बरोबर कैलासाला गंधर्वनगरीत नेले. नंतर या तिन्ही नाथांसहीत अडभंगनाथ सर्व तिर्थे भ्रमण करीत करीत काशी नगरीत आले. काशी नरेश धर्मनाथाला, मच्छिंद्रनाथाच्या आदेशाने नाथपंथाची दिक्षा दिली. व पुढे हे पाचही नाथ, पुढील तिर्थयात्रेकरिता भ्रमण करू लागले. ते अज्ञानी जनतेला अध्यात्म मार्ग दाखवून त्यांच्या अंगची कर्तृत्व शक्ती जागृत करून, लोकांना जीवनाचा अर्थ सांगत फिरले. भारतातच नव्हे तर सर्व भूखंडात अडभंगनाथाचा वावर आहे. शके १७१० नंतर सर्व नाथांनी गुप्त समाध्या घेतल्या. परंतु अडभंगनाथ हे अग्नीचे अवतार असल्याने ते चिरंजीव आहेत. आजही त्यांचा भामानगरीमध्ये अडभंगनाथाचे वास्तव्य आहे. आजही ते लोकांची मनोकामना पूर्ण करतात.
त्या काळी अडभंगनाथांनी या ठिकाणी आश्रम स्थापन करून गुरूकुल गोशाळा बांधली. ईश्वर भक्ती, गुरुभक्ती व जीवब्रम्ह सेवेचे महत्तव पटवण्यासाठी अनुयायी तयार केले. कृषि तंत्रज्ञानाचा विकास केला. बदल हा काळाचा स्वभाव आहे. हजारो वर्षापूर्वीचे नाथवैभव राहिले नाही. ते सद्‌गुरू नारायणगिरीजी महाराजांनी आपले लाडके शिष्य स्वामी अरूणनाथगिरी महाराजांना सांगितले व ते वैभव पुन्हा या तपोभूमीत निर्माण करण्यासाठी शुभाशिर्वाद दिले.

भव्य धर्मनाथ बीज महोत्सव दैनंदिन कार्यक्रम

किर्तन महोत्सव

२४ जानेवारी २०२५
ह.भ.प. श्री. शुभम महाराज कांडेकर

डॉ. आचार्य, उंबरगाव

२५ जानेवारी २०२५
ह.भ.प. श्री. रामरावजी महाराज ढोक

रामायणाचार्य, नागपूर

२६ जानेवारी २०२५
ह.भ.प. श्री. कविराज महाराज झावरे

युवा किर्तनकार, पारनेर

२७ जानेवारी २०२५
ह.भ.प. श्री. सोपान महाराज सानप

भागवताचार्य, शास्त्री, हिंगोली

२८ जानेवारी २०२५
ह.भ.प. श्री. संजय नाना धोंडगे

किर्तनकेसरी, नाशिक

२९ जानेवारी २०२५
ह.भ.प. श्री. एकनाथ महाराज चत्तर

शास्त्री वारकरी भूषण, परभणी

३० जानेवारी २०२५
ह.भ.प. श्री. अक्रूर महाराज साखरे

किर्तनकेसरी, बीड

३१ जानेवारी २०२५
ह.भ.प. श्री. उमेश महाराज दशरथे

वाणीभूषण, आळंदी

शनिवार, १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा. काल्याचे किर्तन
ह.भ.प. श्री स्वामी अरुणनाथगिरी महाराज

मठाधिपती, अडबंगनाथ संस्थान भामानगर

महाप्रसाद: श्री. अविनाशजी भामरे साहेब

IT ऊद्योजक, पुणे